विहिंपच्या मंदिर स्वच्छता अभियानास प्रारंभ; पहिल्याच दिवशी १७५ मंदिरांची स्वच्छता

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय राज्यव्यापी मंदिर स्वच्छता अभियानाला शनिवारी (दि. ३१) उत्साहात प्रारंभ झाला. अभियानाच्या पहिल्याच दिवशी शहरातील १७५ मंदिरांसह परिसर स्वच्छ करण्यात आला. संघदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या संपूर्ण देवगिरी प्रांतात एकूण १,८५० मंदिरांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली असून, यामध्ये विविध सामाजिक संस्था आणि उपासना मंडळांच्या १,४०० हून अधिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक-पुरोहित आयामाच्या वतीने ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर असे दोन दिवस हे अभियान होत आहे. मंदिरांचे पावित्र्य, स्वच्छता आणि सामाजिक सहभागाचा संदेश देत या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील विविध धार्मिक,
सामाजिक आणि सेवाभावी संस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, सनातन संस्था, गरुड झेप अकॅडमी, नंदिनाम गोसेवा संघटन, बागेश्वर धाम व पतंजली योग समिती यांच्यासह विविध संस्था संघटना, उपासना मंडळे, विद्यार्थी, धार्मिक-सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, मंदिरांचे विश्वस्त तसेच महिला-पुरुष भाविकांनी या अभियानात उत्साहाने सहभाग
घेतला. केवळ मंदिरेच नव्हे, तर बुद्धविहार, जैन स्थानके आणि गुरुद्वारांचीही स्वच्छता करण्यात आली.
दरम्यान, रविवार (दि.१) शहरात या अभियानाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या स्वच्छता सेवाकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या अर्चक-पुरोहित आयामाचे देवगिरी प्रांत संपर्कप्रमुख राजीव जहागीरदार यांनी केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions